इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, २९ डिसेंबर, २०२३

 




नुतन वर्षाची सुरवात शिवमय होणार....

 

छत्रपती शिवरायांवरील महानाट्य ‘शिवगर्जना’ प्रयोगाचे मोफत

दि. 5, 6 व 7 जानेवारी रोजी कोल्हापुरात आयोजन

 

महानाट्य पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी यावे - पालकमंत्री हसन मुश्रीफ

 

कोल्हापूर, दि. 29 (जिमाक): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या 350 व्या वर्षपूर्तीनिमित्त राज्य सरकारकडून राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांवरील महानाट्याच्या प्रयोगाचे आयोजन केले जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दिनांक 5, 6 व 7 जानेवारी 2024 रोजी या महानाट्याचे आयोजन शहरात गांधी मैदान येथे केले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती जनसामान्यांना करुन देण्यासाठी 3 प्रयोगांचे आयोजन एकाच ठिकाणी सलग तीन दिवस होणार आहेत. हे महानाट्य पाहण्यासाठी सर्वांसाठी मोफत प्रवेश असणार आहे. झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांसह अशासकीय सदस्यांची समिती गठित केली आहे. किमान दहा हजार शिवप्रेमींसाठी या महानाट्याचे नियोजन केले जाणार आहे. यासाठी वाहनतळ, रस्ते मार्ग, आपत्ती व्यवस्थापन, बैठक सुविधा, जनजागृती आदी विषयांवर चर्चा व नियोजन करण्यात आले. हे महानाट्य पाहण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

 

या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे सूचनेनुसार संबंधित विभागप्रमुखांची नियोजन बैठक संपन्न झाली.  या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, अतिरिक्त आयुक्त रवीकांत अडसूळ, प्रकल्प संचालक मनीषा देसाई, उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार स्वप्नील रावळे, प्रमोद पाटील, आदित्य बेडेकर यांचेसह इतर अधिकारी व अशासकीय सदस्य उपस्थित होते.

 

आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य शिवगर्जना

भारतभर घोडदौड करणारे...

कोल्हापूरच्या भूमिपुत्रांनी साकारलेले ...

शिवगर्जना महानाट्य आता आपल्या कोल्हापुरात...

हे महानाट्य कोल्हापुरातील भूमिपुत्रांचे असून आजवर या महानाट्याने संपूर्ण भारतात हिंदी आणि मराठी अश्या दोन्ही भाषेत 85 प्रयोग यशस्वीरित्या सादर केले आहेत, भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीतही  हे महानाट्य सादर झाले आहे. या महानाट्यात 250 कलाकारांसह हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी यांचा प्रत्यक्ष वापर होणार आहे. तर 140 फूट लांब आणि 60 फूट उंच असे भव्य दिव्य नेपथ्य असणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला नेत्रदिपक आतिषबाजीही असणार आहे, तसेच लोकनृत्य आणि लोककलांची व्यवस्थित सांगड घातली आहे. महानाट्याच्या निर्मात्या रेणू यादव असून दिग्दर्शन स्वप्नील यादव यांनी केले आहे.

12व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत  आणि शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेका पर्यंत पूर्ण इतिहास मांडण्यात आला आहे.

00000

शुक्रवार, २२ डिसेंबर, २०२३

दिव्यांग व्यक्तींना हरित उर्जेवर चालणाऱ्या फिरत्या वाहन योजनेला 4 जानेवारी अखेर मुदतवाढ

 


कोल्हापूर, दि. 22 (जिमाका) :  दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याबाबतची योजनेला 4 जानेवारी 2024 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

या योजनेचा लाभ राज्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी https://evehicleform.mshfdc.co.in हि लिंक उपलब्ध करुन देण्यात आली असून, दिनांक 4 जानेवारी 2024 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी या योजनेचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा.

दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे व सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार/कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

000000

राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेला 4 जानेवारी अखेर अर्ज करण्यास मुदतवाढ

 


 

            कोल्हापूर, दि. 22 (जिमाका) :  देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती या योजनेसाठी सन २०२३-२४ करिता विद्यार्थ्यांकडून जाहिरातीद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत. दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी सायं. 6.15 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून पोस्टाने किंवा समक्ष समाजकल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे  411001 येथे सादर करावेत, असे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी कळविले आहे.

अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी  www.maharashtra.gov.in  (जलद दुवे- रोजगार) या संकेत स्थळाला भेट द्यावी.

000000

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कारासाठी 31 जानेवारीपर्यंत प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन

 


            कोल्हापूर, दि. 22 (जिमाका) : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड:मय निर्मितीसाठी राज्य शासनाच्यावतीने स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार योजना जाहीर झाली असून यासाठी प्रवेशिका 31 जानेवारीपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिवांनी केले आहे.

            मराठी भाषेतील उत्कृष्ठ वाड:मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2023 करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कारासाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून) तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 1 ते 31 जानेवारी 2024 पर्यंत पाठविता येणार आहेत. दिनांक 1 जानेवारी  ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी मुंबई 400025 यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर 'नवीन संदेश' या सदरात 'स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार 2023 नियमावली व प्रवेशिका' या शीर्षाखाली व 'What's new' या सदरात Late Yashwantrao Chavan State Literature Award 2023 Rules Book and Application Form या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या https://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील.

            प्रवेशिका पूर्णत: भरुन आवश्यक कागदपत्रांसह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 1 ते 31 जानेवारी 2024 या विहित कालावधीत पोहचतील अशा पाठवाव्यात. लेखक, प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक, प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी मुंबई 400025 येथे पाठवाव्यात. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक, प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हे साहित्या दिनांक 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2024  या विहित कालावधीत पाठवाव्यात. लेखक, प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना बंद लिफाफ्यावर, पाकीटावर स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार 2023 साठी प्रवेशिका असा स्पष्ट उल्लेख  करावा. प्रवेशिका व पुस्तके स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2024 राहिल. विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत.

00000

मंगळवार, १९ डिसेंबर, २०२३

केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभासाठी विकसित भारत संकल्प यात्रा महत्वपूर्ण

 


        केंद्र सरकारच्या वतीने सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विविध महत्वपूर्ण योजना राबविल्या जात आहेत. देशातील नागरिक, गावे, शहरे आणि राज्यांच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाने विविध योजना हाती घेतल्या आहेत. या योजना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून त्याचा लाभ नागरिकांना देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील गरजू नागरिकांपर्यंत विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचवून त्यांना केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शासनाच्या योजनांची माहिती पोहचवण्यासाठी करवीर तालुक्यातील कंदलगाव येथे घेण्यात आलेल्या महाशिबीराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहीम केंद्र सरकारच्या वतीने 15 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सुरु असणाऱ्या या यात्रेच्या माध्यमातून देशातील महिला, युवक, शेतकरी, खेळाडू आणि गरजूंच्या जीवनाचा स्तर उंचावण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

संकल्प यात्रेची उद्दिष्टे - विविध योजनांतर्गत पात्र परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत विविध योजनांची माहिती पोहोचवणे, या माहितीचा प्रसार करुन त्याबद्दल जागरुकता निर्माण करणे, नागरिकांशी व लाभार्थ्यांशी संवाद साधणे, यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशीलांद्वारे संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करुन घेणे अशी या योजनेची उद्दिष्टे आहेत.

 

ठळक वैशिष्ट्ये - सुरुवातीला लक्षणीय अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेल्या 110 जिल्ह्यांना आणि नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून 26 जानेवारी 2024 पर्यंत उर्वरित जिल्ह्यांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेचा समन्वय साधण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचे विविध विभाग कार्यरत आहेत. या यात्रेच्या प्रभावी समन्वयासाठी राज्य स्तरावर समिती नेमून राज्य व जिल्ह्यांमध्ये नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

 

 संकल्प यात्रेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद - ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ जिल्ह्यात सुरु असून या अंतर्गत शहरी व ग्रामीण भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांपासून वंचित असणाऱ्या लाभार्थ्यांपर्यंत या योजनांची माहिती पोहोचवून त्याचा लाभ वंचित घटकांना मिळण्यासाठी हे अभियान जिल्ह्यासह राज्यभरात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येत आहे.

 

विविध योजनांची माहिती - विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात राधानगरी, शिरोळ, चंदगड, कागल, हातकणंगले, शाहूवाडी, करवीर, भुदरगड, पन्हाळा, आजरा, चंदगड व गगनबावडा अशा 12 तालुक्यात विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. या मोहिमेत केंद्र सरकारच्या विविध महत्वाकांक्षी योजनांचा समावेश आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात 430 ठिकाणी झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाला 1 लाख 85 हजारहून अधिक नागरिकांनी भेट दिली आहे. जिल्ह्यात 1025 ग्रामपंचायतींमधे कार्यक्रम होत असून 26 जानेवारीपर्यंत कार्यक्रम सुरु राहणार आहेत. या संकल्प यात्रेअंतर्गत 18 डिसेंबरपर्यंत सुरक्षा बीमा योजनेच्या एकूण 1192 लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. जीवन ज्योती योजनेचा लाभ 961 लाभार्थ्यांना, आरोग्य शिबीराचा लाभ 13 हजार 525 लाभार्थ्यांनी घेतला आहे. पीएम उज्वला योजनेच्या लाभासाठी नोंदणी केलेल्या नागरिकांची संख्या 1 हजार 487 आहे. क्षयरोगासाठी तपासणी केलेल्या लोकांची संख्या 19 हजार 225 आहे. सिकलसेल तपासणी केलेल्या लोकांची संख्या 7 हजार 801 आहे. या व्यतिरीक्त नैसर्गिक शेती करणाऱ्या 210 शेतकऱ्यांशी संवाद साधला गेला.  विकसित भारत संकल्प यात्रे अंतर्गत ‘मेरी कहानी मेरी जुबानी’ मनोगत एकूण 548 लाभार्थ्यांनी नोंदविले.

            कंदलगावमधील महाशिबीरातून लाभ- विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देवून जिल्ह्यातील अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी करवीर तालुक्यातील कंदलगाव येथे 18 डिसेंबर रोजी महाशिबीर घेण्यात आले. या यात्रेला लाभार्थी शेतकरी, महिला, पुरुष व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग दिला. येथे उभारण्यात आलेल्या विविध योजनांच्या स्टॉल्स मधून 1 हजार 200 हून अधिक नागरिकांना लाभ देण्यात आला. यावेळी हर घर जल योजने अंतर्गत शंभर टक्के नळ जोडणी केल्याबद्दल तसेच आयुष्यमान भारत योजनेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कंदलगावचा तसेच विविध योजनांमध्ये चांगले काम करणाऱ्या ग्रामपंचायती व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. आयुषमान भारत, प्रधानमंत्री आवास, हर घर जल, प्रधानमंत्री उज्वला  योजना, दिनदयाल अंत्योदय योजना, संजय गांधी निराधार योजना, महा-ई-सेवा, किसान क्रेडीट कार्ड, जन धन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा, स्वामित्व योजना, प्रधानमंत्री पोषण अभियान, प्रधानमंत्री किसान सन्मान, प्रधानमंत्री प्रणाम, नॅनो फर्टीलायझर योजनेसह कौशल्य, रोजगार व नाविन्यता विभाग, समाजकल्याण, कृषी, पशुसंवर्धन आदी विविध योजनांची माहिती या ठिकाणी देण्यात आली.

देशातील महिला, युवक, शेतकरी, खेळाडू, गरजू आदी घटकांसाठी विकसित भारत संकल्प यात्रा देशभरात सुरु आहे. केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ वंचित घटकांना मिळण्यासाठी ही संकल्प यात्रा महत्वपूर्ण ठरेल..

                                                                        लेखन- वृषाली पाटील,

                                                                        माहिती अधिकारी,

                                        जिल्हा माहिती कार्यालय,

                                                                        कोल्हापूर

 

000000

गुरुवार, ३० नोव्हेंबर, २०२३

पोखले, पन्हाळा येथील जनऔषधी केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ.विनय कोरे, सहकार आयुक्त, जिल्हाधिकारी व सीईओ यांच्या हस्ते नागरिकांना मेडीकल किटचे वितरण

 










कोल्हापूर, दि. 30 (जिमाका):   केंद्र शासनाच्या भारतीय जनऔषधी परियोजनेअंतर्गत श्री बलभीम विकास सेवा संस्था मर्या. पोखले, ता. पन्हाळा जि. कोल्हापूर या संस्थेसाठी मंजूर झालेल्या जन औषधी केंद्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन स्वरुपात संपन्न झाले. त्यानंतर पोखले येथील या कार्यक्रमात जनऔषधी केंद्राचे उद्घाटन स्थानिक स्तरावर खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ.विनय कोरे यांच्या हस्ते व सहकार आयुक्त अनिल कवडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, सीईओ संतोष पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी विभागीय सहनिबंधक अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे, शाहूवाडी विभागाचे प्रांताधिकारी समीर शिंगटे, पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे-जाधव, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, सहाय्यक निबंधक नारायण परजणे, बलभीम संस्थेचे अध्यक्ष धीरज नाईक, उपाध्यक्ष संताजी निकम, विद्यमान सरपंच अशोक पाटील, माजी सरपंच डॉ.पांडूरंग निकम, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, संस्थेचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील, प्रल्हाद पाटील, दत्तात्रय पाटील, सचिव विलास गायकवाड, राजेंद्र कोळेकर यांच्यासह वारणा समुहातील व पोखले गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 यावेळी देशातील विविध ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी प्रधानमंत्री महिला किसान ड्रोन केंद्र योजना यावेळी सुरु केले. कार्यक्रमा दरम्यान, पंतप्रधानांनी एम्स, देवघर, झारखंड येथे ऐतिहासिक 10,000 व्या जन औषधी केंद्राचे लोकार्पण केले. पुढे, श्री मोदींनी देशातील जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरुन 25,000 पर्यंत वाढवण्याच्या कार्यक्रमाची घोषणही केली. या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, विकसित भारत संकल्प यात्रेला आज १५ दिवस पूर्ण होत आहेत आणि आता यात्रेला वेगही आला आहे. ते पुढे म्हणाले, आरोग्य सेवा परवडणारी आणि सहज उपलब्ध करुन देणे हा पंतप्रधानांच्या निरोगी भारताच्या संकल्पनेचा आधारस्तंभ आहे. स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून देण्यासाठी जनऔषधी केंद्राची स्थापना हा या दिशेने एक प्रमुख उपक्रम आहे.

 कार्यक्रमाच्या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी कार्यक्रम पाहण्यासाठी प्रशासनाकडून एलईडी स्क्रीनची सोय करण्यात आली होती. कार्यक्रमात खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, सहकार आयुक्त, जिल्हाधिकारी व सीईओ यांच्या हस्ते नागरिकांना मेडीकल किटचे वितरण करण्यात आले. यात  परवडणारी औषधे व सॅनिटरी किटचा समावेश होता. प्रा.जीवनकुमार शिंदे व प्रा.नामदेव चोपडे यांनी सूत्रसंचालन केले.

 

विकसित भारत संकल्प यात्रेच्या चित्ररथाचे फीत कापून खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते उद्घाटन

पन्हाळा तालुक्यात दाखल झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या प्रसिद्धी चित्ररथाचे उद्घाटन फीत कापून खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार डॉ.विनय कोरे यांच्यासह सहकार आयुक्त अनिल कवडे व जिल्हाधिकारी राहुल रेखावर, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील उपस्थित होते. या वाहनाद्वारे पन्हाळा तालुक्यातील विविध गावांमध्ये संकल्प यात्रेबाबत प्रचार प्रसिद्धी केली जाणार आहे.

00000

सोमवार, २० नोव्हेंबर, २०२३

चिकोत्रा नदीच्या भागामध्ये शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसायंत्रावर बंदी

 


कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) :  चिकोत्रा प्रकल्प चिकोत्रा नदीच्या भागामध्ये शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर उपसाबंदीचे आदेश कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण) उप कार्यकारी अभियंता शिल्पा मगदुम यांनी दिले.

              उपसाबंदी क्षेत्र चिकोत्रा नदी को.प.बंधारा 1 ते को.प.बांधारा 29 (बेळुंकी) कालावधी- 28 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर, 27 नाव्हेंबर ते 6 डिसेंबर तसेच 27 डिसेंबर ते 5 जानेवारी, 26 जानेवारी ते 4 फेब्रुवारी,25 फेब्रुवारी ते 6 मार्च, 25 मार्च ते 3 एप्रिल, 22 एप्रिल ते 1 मे  व 16 ते 28 मे या कालवधीत उपसाबंदी  लागू राहील.

            उपसाबंदी कालावधीत पाण्याचा अनाधिकृत उपसा आढळून आल्यास संबंधित उपसा यंत्र जप्त करुन परवानाधारकाचा उपसा परवाना 1 वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे विभाग जबाबदार राहणार नाही, असेही श्रीमती मगदुम यांनी कळविले आहे.

0000000

मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०२३

कुणबी नोंदी शोधण्यासाठी चोख नियोजन करा - निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली

 

     कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : कुणबी नोंदी शोधण्यासाठी चोख नियोजन करा, त्याचबरोबरच तपासलेल्या अभिलेख्यांच्या नोंदी बाबतची माहिती जिल्हा प्रशासनाला दररोज सादर करा,  अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केल्या.

     कुणबी नोंदी शोधण्यासाठी संपूर्ण राज्यभर मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातही स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्ह्यात विविध विभागांनी करावयाच्या कामांच्या नियोजनाबाबत निवासी उपजिल्हाधिकारी श्री. तेली यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी पुराभिलेखागार विभागाच्या सहायक संचालक दीपाली पाटील, तहसीलदार जयवंत पाटील तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    निवासी उपजिल्हाधिकारी श्री. तेली म्हणाले, कुणबी नोंदी तपासण्याचे काम गतीने मार्गी लावण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नियुक्त करा. तसेच योग्य समन्वय ठेवून काम पूर्ण करा. कुणबी नोंदीच्या अभिलेख्यांचे तसेच मोडी, उर्दू लिपीतील अभिलेख्यांचे भाषांतर व डिजिटायजेशन करा.

        अभिलेखांची तपासणी करताना अभिलेख्यांचे प्रकार, तपासणी करण्याच्या पानांची संख्या, नोंदीची संख्या, आढळलेल्या नोंदी, तपासलेल्या नोंदीची संख्या, कुणबी जातीच्या आढळलेल्या नोंदीची संख्या, आदी माहिती विहित नमुन्यात भरुन देण्याच्या सूचनाही श्री. तेली यांनी केल्या.

माजी सैनिकांनी कागदपत्रात मराठा कुणबी नोंदी असल्यास संपर्क साधावा - जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी

 


कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : दिनांक ६ नोव्हेंबर २०२३ पासून जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे मराठा कुणबी नोंदी पडताळणी व त्याचे संगणकीकरण करण्यासाठी विशेष कक्ष सुरु करण्यात आला असून जिल्ह्यातील सर्व सेवारत व सेवानिवृत्त सैनिक अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी विधवा, वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी व सेवारत सैनिकांना कळविण्यात येते की, माजी सैनिकांच्या मराठा कुणबी नोंदीची पडताळणी करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल (निवृत्त) राहुल माने यांनी केले आहे.

ज्या माजी सैनिकांच्या कागदपत्रात कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी अशी नोंद असलेल्या त्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर किंवा जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथील स्पेशल सेलशी कागदपत्रे घेवून संपर्क साधावा असे ही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल (निवृत्त) श्री. माने यांनी कळविले आहे.

****

8 नोव्हेंबरला कोल्हापूरात प्लेसमेंट ड्राईव्ह : नोकरीची संधी

 


कोल्हापूर, दि. 7 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि नॅशनल करिअर सर्व्हिस, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 8 नोव्हेंबर 2023 रोजी ΄सी बील्डींग, शासकीय निवासस्थान, विचारे माळ, कावळा नाका, कोल्हापूर येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी दिली आहे.

                 या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील खाजगी उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला आहे. त्यांच्याकडून विविध प्रकारच्या सुमारे 115 पेक्षा जास्त रिक्तपदे या प्लेसमेंट ड्राईव्हकरीता कळविण्यात आली आहेत. या पदांकरीता किमान 10 वी, 12 वी, कोणत्याही शाखेतील पदवीधर, ‍अभियांत्रिकी पदविका, आय.टी.आय. इत्यादी पात्रता असणारे उमेदवार पात्र राहतील. इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळास भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन नोंदविणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मुलाखतीला येताना उमेदवारांनी आपला बायोडाटा, सर्व ‍शैक्षणिक कागदपत्रे, आवश्यकतेनुसार अर्जाच्या व आधारकार्डच्या प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. या संधीचा लाभ जास्तीत जास्त उमेदवारांनी घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी मेघना वाघ, यंग प्रोफेशनल (एन.सी.एस) यांच्याशी उमेदवार आणि उद्योजकांनी 0231-2545677  या दुरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्री. माळी यांनी केले आहे.

0000