इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, १२ मार्च, २०१२

यशवंतराव चव्हाण यांचे जीवनकार्य दीपस्तंभाप्रमाणे - डॉ. विलासराव पवार यांचे प्रतिपादन

      कोल्हापूर दि. १२ : यशवंतराव चव्हाण यांचे जीवनकार्य दीपस्तंभाप्रमाणे आहे. त्यांच्या जीवनकार्यातून बोध घेण्याची आणि त्यानुसार कृतीची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन निवृत्त प्राचार्य डॉ. विलासराव पवार यांनी आज केले.
      आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात डॉ. पवार बोलत होते. ताराराणी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारीसंजय पवार, पुरवठा अधिकारी संजय शिंदे, नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे, कोषागार अधिकारी अजित चौगुले, पुनर्वसन अधिकारी  संजय तेली उपस्थित होते. यावेळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
      डॉ. पवार म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत आणि सुजाण महाराष्ट्र घडविण्याचे ध्येय बाळगले होते. त्यासाठी त्यांनी विश्वकोष मंडळ, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, लोकसंस्कृती मंडळ अशा विविध संस्था स्थापन केल्या. लोकसाहित्य सर्वांपर्यंत पोहोचायला हवं यासाठी त्यांनी पुस्तकांची, ग्रंथांची निर्मिती करण्यावर भर दिला. नाट्य संस्थांना अनुदान दिले. लोककलेला प्रोत्साहन मिळेल अशी व्यवस्था केली.
      यशवंतराव चव्हाण यांनी कृषि औद्योगिकरणातून महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते, असे सांगून डॉ. पवार म्हणाले, हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी सहकार चळवळीला प्रोत्साहन दिले. साखर कारखाने स्थापन करण्यास परवाने दिले. कृषि मालावर प्रक्रिया उद्योग उभे राहतील यासाठी प्रयत्न केले. कृषि विकास होण्यासाठी सिंचन प्रकल्पांना प्राधान्य दिले. कमी उत्पन्न असणार्‍या पालकांच्या अपत्यांना मोफत शिक्षण देण्याची योजना यशवंतराव चव्हाण यांनी राबवली. या योजनेवर टीका झाली. बेरोजगारी वाढेल, असे म्हटले जाऊ लागले. पण या शिकलेल्या तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी औद्योगिकीकरण आवश्यक असल्याने त्यांनी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली.
      डॉ. पवार म्हणाले, यशवंतराव चव्हाण उच्च प्रतीचे राजकारणी तर होतेच, पण त्याचबरोबर एक उत्कृष्ट साहित्यिक, कलारसिक, कवीही होते. त्यांचे विरोधी पक्षातील नेत्यांशीही सौहार्दाचे संबंध होते.
      निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी प्रास्ताविक केले, तर पुनर्वसन अधिकारी संजय तेली यांनी आभार मानले. नायब तहसिलदार सरस्वती पाटील यांनी सूत्रसंचलन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.